आषाढाच्या प्रथम दिवशी
गोळा जाहले मेघ अंबरी
आकाशी चमकली चंचला
कडाड कडाड नाद करी
आला आला पाऊस म्हणता
सुरू जाहल्या पाऊस धारा
मेघ गर्जती धडाड धूम
संगतीला सोसाट्याचा वारा
पशू, पाखरे, धेनू, वासरे
हर्ष मनी सकलांच्या दाटे
शुष्क झालेले सरिता नाले
धावत सुटले त्यांच्या वाटे
कुहू कुहू कोकिळ गातसे
आम्र वृक्षाच्या डहाळीवर
गीत तिचे ऐकून घालावा
कवी मनाला कसा आवर
तृण बाळे गवताची फुले
शोभा जगताची खुलविते
सप्तरंगी कमान आकाशी
कवींच्या मनास मोहविते
महाकवी कालिदास दिन
प्रथम दिवस आषाढाचा
स्मरण करू महाकवीला
नमस्कार त्यास पंडिताचा
Comments
Loading comments…