120Log inSign up
by Vaibhav Kulkarniप्रयत्नांती पुन्हा परमेश्वरच ?
Details

तुला शेवटचे सांगतोय, असे कधीपासून म्हणतोय

तू आहेस म्हणून अजूनही, सोडत नाहीये आशा

नाहीतर मी सुद्धा माझा कधीच गुंडाळला असता गाशा || ध्रु ||


तुझ्यापेक्षा मोठी आहे आज आमच्याकडे माया

कुबेराला सुद्धा कधीतरी, देऊ आम्ही छत्रछाया


सूर्यापेक्षा तेज आमचे आज झाले आहे प्रखर

आता तरी घे दखल, नाहीतर सणाला सुद्धा तुला आता मिळणार नाही मखर


कृष्ण हरे, राम ही हरे, सगळा करून ठेवलायस गुंता

आता समजत नाही आम्हाला, गोपी खऱ्या का सीता


खून होवो वा हत्या, भूकंप येवो वा पूर

कुणी करो अत्याचार किंवा अगदी बलात्कार

काहीही झाले तरी आम्ही नसतो मरत

वाट पाहत असतो, की तू नक्कीच काहीतरी असशील करत


म्हणूनच, "तुला शेवटचे सांगतोय", पण…. असं कधीपासून म्हणतोय

तू आहेस म्हणून अजूनही, सोडत नाहीये आशा

नाहीतर मी सुद्धा माझा कधीच गुंडाळला असता गाशा || ध्रु ||


भोळ्याभाबड्या आशेला आमच्या नको लावू आशा

मिरवणुकीलासुद्धा आता मी वाजवणार नाही ताशा


अंतराळातसुद्धा आता आम्ही ठेवली नाहीये पोकळी

मुले राहिलो नाहीयेत रे आता आम्ही तुझी कोवळी


अथांग सागराचा देखील लागलाय आज आम्हाला थांगपत्ता

म्हणूनच की काय कदाचित तू झालायस बेपत्ता


घाबरु नकोस; अजूनही तुझ्यावरचा उडाला नाहीये विश्वास

तुझ्या परवानगीशिवाय अजूनही घेत नाहीये श्वास


पण तरीही,


"आता तुला शेवटचे सांगतोय", पण… असे कधीपासून म्हणतोय

तू आहेस म्हणून अजूनही, सोडत नाहीये आशा

नाहीतर मी सुद्धा माझा कधीच गुंडाळला असता गाशा || ध्रु ||

Loading comments…