एव्हाना बोलण्यातून अजित याच जिल्ह्यात नोकरीला आहे हे दिनकर मास्तरांना समजलंच होतं. "पोरा इथं सारीच कुडाची व कौलारू घरं आहेत बाबा. हातावर पोट असणारी गरीब आदिवासी वस्ती आहे ही. रोजच्या जगण्याची भ्रांत असल्यावर कुठनं आली पक्की घरी?, पण आपली शाळा मात्र इंग्रज काळातली पक्की वास्तू आहे. बघ तु राहत असशील तर तेथे" . मास्तरांनी त्यांना डोंगर उतरत शाळा दाखवली. शाळा प्रशस्त, हवेशीर, नदीच्या काठावर वसलेली. आंब्याच्या, मव्हाच्या झाडांनी व बांबूच्या बेटांनी वेढलेली. मोठं आवार कंपाऊंडनं बंदिस्त . आवारात पहाडात सहसा न आढळणार भलं मोठ वडाचं झाडं. तिथंनं आजुबाजुच्या उंचच उंच डोंगरावर चहुबाजुंनी पाड्या - पाड्यांनी वसलेलं 'सोनवाईपाडा' गाव रम्य दिसत होतं
Loading comments…